पिंपरी : शहरातून अलिशान वाहनांची चोरी करून त्यांचा वापर राजस्थान राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे. या टोळीने शहरातून १२ महागड्या वाहनांची चोरी केली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी या टोळीचा महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये शोध घेत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून १ कोटी १३ लाख रुपये किमतीच्या सहा मोटारी जप्त केल्या आहेत.
ओमप्रकाश लादुराम बिस्नोई (वय २८, रा. रोहिला, जि. बाडमेर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आरोपींचा तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसात पिंपरी-चिंचवड शहरातून महागड्या मोटारी चोरीला जाण्याचे सत्र सुरु होते. त्याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तपास करीत होते. शहरातून चोरीला गेलेल्या वाहनांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आरोपी पिंपरी-चिंचवड शहरातून मोटारी चोरून त्यांची राजस्थान राज्यात विक्री करीत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. ही टोळी राजस्थान मधून येऊन अलिशान वाहनांची चोरी करीत असे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि त्यांच्या सहा कर्मचाऱ्यांचे एक पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ओमप्रकाश याचा हरिद्वारपर्यंत पाठलाग केला. आरोपी हरिद्वार येथून परत राजस्थानकडे येत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला अजमेर येथे शिताफीने पकडले. पिंपरी पोलीस ठाण्यातील स्कॉर्पिओ चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसह मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून एकूण १२ महागड्या मोटारी चोरल्याचे सांगितले.
या कारवाईमुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार, निगडी पोलीस ठाण्यातील दोन, चिखली, भोसरी, देहूरोड, वाकड, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील एक असे एकून डझनभर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
बॅरीगेट तोडण्यासाठी लोखंडी बंपर अमंली पदार्थांची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले तर बॅरीगेट तोडता यावेत यासाठी लोखंडी बंपर आणि त्याच्या वरून कंपनीचा खरा प्लास्टिक बंपर लावला जात असे. आरोपी चोरलेली वाहने राजस्थान येथे नेत. तिथे मोटारींचे चेसिस नंबर आणि इंजिन नंबर ग्रॅडरच्या सहाय्याने घासून ते बुजवून टाकत. त्यामुळे मोटारीच्या ओळखीच्या खुना नष्ट होत असत.
आरोपी पकडण्यासाठी पोलिसांचा हजारो किलोमीटर प्रवासपिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी मार्च २०१९ मध्ये चोरी झालेले वाहन धुळे येथे पकडले होते. त्यावेळी पंजाब राज्यातील आरोपींना पोलिसांनी पकडले होते. तर अलीशेर उर्फ इम्रान समशेर अहमद (रा. औरंगाबाद. मूळ रा. अजमगड, उत्तर प्रदेश) याला बुलढाणा येथून अटक केली होती. हे आरोपी चोरलेली वाहने दुसऱ्या राज्यात नेऊन विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिटच्या पोलिसांनी पंजाब, राजस्थान असा हजारो किलोमीटर प्रवास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.