पिंपरी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ असा आसमंत दणाणून सोडणारा जयघोष, ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, लहान थोरांच्या अपूर्व उत्साहात, अशा मंगलमय वातावरणात बुद्धीची देवता श्री गणरायाचे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत शुक्रवारी आगमन झाले. वरुणाभिषेकाने गणेशभक्तांमध्ये भक्तिचैतन्य संचारले होते.उद्योगनगरीत मोठ्या मनोभावे बाप्पांचे स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच गणेशभक्तांत चैतन्य संचारले होते. अगदी सकाळपासूनच आज पावसाची रिमझिम सुरू होती. अशातही गणेशभक्तांचा उत्साह कमी झालेला नव्हता. पाऊस सुरू असतानाही भाविकांची लगबग सुरू होती. मुहूर्तानुसार पहाटे चारपासूनच बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याची वेळ होती. घरोघरी सकाळीच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पाऊस सुरू असतानाही लहानथोरबाप्पांना घरी घेऊन जातानादिसत होते. काही जण छत्री धरून तर काही जण दुचाकीवरून, चारचाकीतून गणरायाला घेऊन जाताना दिसत होते.शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, प्राधिकरण, दापोडी, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तसेच गणपती मूर्ती विक्रीच्या ठिकाणीही लगबग दिसत होती. डोक्यावर टोपी, सलवार कुर्ता, नऊवारी साडी परिधान केलेल्या महिला, भगव्या रंगाच्या बाप्पा मोरया असे लिहलेल्यापट्या बच्चे कंपनीने बांधलेल्या होत्या. पावसात भिजत ढोल-ताशा वाजवित, ‘गणपती बाप्पा मोरया....’ असा जयघोष करीत जातानादिसत होते. पाऊस सुरूअसताना काही जणांना बप्पासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.पूजा साहित्य खरेदीस गर्दीशहरातील प्रमुख बाजारपेठांत पूजा साहित्य मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. पूजेसाठी लागणारे वस्त्र, दुर्वा, फुले, हार, कापूर, उदबत्ती असे पूजेचे साहित्य, मोदक, पेढे, असा नैवेद्य घेण्यासाठी स्वीट मार्टमध्येही भक्तांनी एकच गर्दी केली होती.सार्वजनिक मंडळांतर्फेही प्रतिष्ठापनाविविध चौकाचौकांत, सार्वजनिक सोसायट्यांमध्ये गणरायाचे आगमन झाले. सार्वजनिक मंडळांनी मात्र पाऊस थांबला की मिरवणूक काढायची म्हणून थोडा उशीर केल्याचे दिसून आले. सार्वजनिक मंडळांनी सकाळच्या टप्प्यात मंडप उभारणे, सजावटीची कामे करणे आणि मिरवणुकीचे नियोजन करण्यावर भर दिला. शहरात सर्वत्र गणरायाची महती सांगणारी गीते ध्वनीवर्धकावरून ऐकायला मिळत होती. त्यामुळे वातावरण मंगलमय झाले होते. सायंकाळी काही काळ पावसाने उघडीप दिल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली.
चिंचवडला अथर्वशीर्षचिंचवड येथील पवनानदी तीरावर महासाधू, गणेशभक्त मोरया गोसावी यांचे समाधी मंदिरआहे. गणेशोत्सवानिमित्त संस्कृती संवर्धन व विकास महासंघ व चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने हजारो स्त्री-पुरुषांच्या उपस्थितीत सामुदायिक अथर्वशीर्ष पठण शनिवारी सात वाजता होणार आहे.