उद्याेगनगरीत उत्साहात गणरायाचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 08:19 PM2018-09-13T20:19:41+5:302018-09-13T20:22:20+5:30
उद्याेगनगरी अशी ख्याती असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गणशाचे उत्साहात अागमन झाले.
पिंपरी : गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया... असा जयघोष करीत, ढोल ताशांच्या निनादात, विघ्नहर्त्या गजाननाचे अर्थात लाडक्या गणपती बाप्पांचे उद्योगनगरीत गुरूवारी आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणशोत्सवावर भाविकांनी भर दिला आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. कामगार कष्टकऱ्यांची नगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड नगरीचा नूर काही औरच होता. गेल्या महिनाभरापासून सुरू असणारी उत्कंठा संपली. आज सकाळपासूनच उद्योगनगरी गणेशमय झाली होती. गणरायाची महती सांगणारी गीते कानावर पडत होती. त्यामुळे शहरातील वातावरण दिवसभर मंगलमय असेच होते. प्राणप्रतिष्ठापनेसाठी आज पहाटे ब्राम्ह मुहूर्तापासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त होता. त्यामुळे घरगुती उत्सवाची लगबग अगदी सकाळपासूनच सुरू होती. सजावट करण्यात आणि बाप्पाचे स्वागत करण्यात कुटुुंबं रंगल्याचे चित्र घरोघरी दिसत होते. पारंपरिक वेश परिधान करून भाविक गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. ‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....’ असा जयघोष कानी पडत होता. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत गणरायाला आणले आणि प्रतिष्ठापना केली. गुलाल विरहीत मिरवणूक आणि ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा वापर अधिक प्रमाणावर दिसून आला. ढोल-ताशांच्या दणदणाटात बाप्पाचे स्वागत करण्यात अाले. सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. तसेच काही मंडळांनी पहिल्याच दिवशी देखावे सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न केले. तसेच सजावटीतही कार्यकर्ते मग्न असल्याचे दिसून आले.
फुलांची सजावट, थर्मोकोलचा वापर कमी
घरगुती गणेशोत्सवासाठी मखरे वापरली जातात. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिक आणि थर्मोकोलला बंदी असल्याने भाविकांनी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणावर भर दिल्याचे दिसून आहे. थर्मोकोलची मखरे बाजारपेठेतून गायब झाल्याचे दिसून आले. तसेच प्लॉस्टिक ऐवजी कागदी फुलांचा वापर अधिक दिसून आला. तसेच कागदी मखरेही अधिक प्रमाणावर दिसून आली. त्यामुळे पर्यावरण पुरक उत्सवाचा वेगळाच रंग दिसून येत होता.