पिंपरी : आळंदी परिसरात चोरट्यांनी घरावर सशस्त्र दरोडा टाकत दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवनू ९८ हजार रुपये किमतीचे सोने व रोकड चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. २२) पहाटे अडीच ते तीनच्या कालावधीत चऱ्होली खुर्दमधील वडगाव रोडवरील सुरेशनगर येथे घडला.
याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात पाच दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रमेश विठ्ठल थोरवे (वय ४३. रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे चऱ्होली खुर्दमधील वडगाव रोडवरील वस्तीवर राहतात. या परिसरात लोकवस्ती विरळ आहे. घरात थोरवे आणि त्यांची पत्नी असे दोघेच राहतात. गुरुवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान पाच दरोडेखोर स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच ४३ बीजे ५५९६) मोटारीमधून आले. त्यांनी थोरवे यांच्या घराचा दरवाजा लाथा मारून तोडला. घरामध्ये जबरदस्तीने घुसत थोरवे व त्यांच्या पत्नीच्या गळ्यावर कोयता व विळा ठेवून धाक दाखवत ९७ हजार रुपये किमतीचे १९ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.