पिंपरी : मे महिन्याच्या सुटीचे औचित्य साधून निगडीच्या एकलव्य कला अकादमीच्या वतीने शहरातील ‘पैस’ या पहिल्यावहिल्या निकट रंगमंचावर दोनदिवसीय विनामूल्य कार्यशाळा झाली. नाटक, सिनेमा या विषयांवर परिसंवाद आणि सादरीकरण अशा विविध कलाविष्कारांचा समावेश होता. या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. पहिल्या दिवशी पुरुषोत्तम करंडक २०१५ मधील पिंपरी-चिंचवडमधून अंतिम फेरीत गेलेल्या इंदिरा महाविद्यालयाच्या ‘ईश्वरसाक्ष’ या एकांकिकेचे सादरीकरण झाले. अमृता ओंबळेलिखित आणि दिग्दर्शिका सायली पासलकरसह कलाकारांची प्रेक्षकांबरोबर सादरीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून ईश्वरसाक्ष एकांकिकेचा प्रवास उलगडला. दुसऱ्या सत्रात ‘मराठी रंगभूमीचे बदलते विश्व’ या विषयावर परिसंवाद झाला. यात ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी, डॉ. संजीवकुमार पाटील, डॉ. धीरज कुलकर्णी यांचा सहभाग होता. जोशी म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात अनेक वाहिन्यांवर असणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करताहेत. त्यामुळे रंगकर्मी नाटकापेक्षा या मालिकांकडे वळताहेत. नाटकात अभिनयाचा कस लागतो आणि मालिकांमध्ये आपल्याला नाव आणि पैसा मिळतो. या दोन्हींचा विचार करता नवोदित कलाकार मालिकांना प्राधान्य देतात. त्यामुळे कलाकारांनी पैशार्थी व्हायचे की, रंगकर्मी; ते ठरवायला हवे.’’ पाटील म्हणाले, ‘‘सध्याचे स्पर्धेचे युग आहे. नाट्य कलावंतांना मालिका, चित्रपट अशी अनेक आव्हाने आहेत. रंगभूमीत नवे बदल होत आहेत. ते सकारात्मक आहेत. पण त्यांची गती मंद आहे.’’कुलकर्णी म्हणाले, ‘‘मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा घेऊन पुढे वाटचाल करायची असल्यास त्याचे औपचारिक शिक्षण घेणे गरजेचे आहे.’’ भोईर म्हणाले, ‘‘कला क्षेत्रात काही तरी करण्याची इच्छा असेल, तर रंगभूमीला पर्याय नाही. शहरातही असे नवे कलाकार घडताहेत. त्यामुळे शहरही नक्कीच भविष्यात कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवेल.’’ शेवटच्या सत्रात राष्ट्रीय पुरस्कारविजेता अमोल देशमुखदिग्दर्शित ‘औषध’ हा लघुपट दाखवण्यात आला. पल्लवी उस्तोरीकर, प्रभाकर पवार आदींनी संयोजन केले. सुहास जोशी आणि अमृता ओंबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
‘पैस’ रंगमंचावर सादर झाला कलाविष्कार
By admin | Published: May 10, 2016 12:34 AM