‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाने रसिकांना भावसंगीतावर प्रेम करायला शिकवले. या कार्यक्रमाच्या मैफली पुण्यातही होत असत. प्रत्येक वेळी सर्व वाद्यवृंद सोबत घेऊन जाणे शक्य नसायचे. त्यामुळे अरुण दाते यांनी पुण्यातील वाद्यवृंद घेऊन कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यामुळे १९८५ च्या सुमारास मी अरुण दाते यांच्या वाद्यवृंदामध्ये सहभागी झालो. तेव्हापासून २८ वर्षे सातत्याने तबल्यावर साथसंगत करण्याचे भाग्य मला लाभले. ३० एप्रिल २०१४ रोजी मी अरुभय्यांसह नाशिकला शेवटचा कार्यक्रम केला.२८ वर्षांच्या सहवासात राज्यासह देशात आणि परदेशात आम्ही अनेक मैफली केल्या. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, सिंगापूर, शारजा, आॅस्ट्रेलिया अशा देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांसाठी ‘शुक्रतारा’ कार्यक्रम सादर केला. अरुभय्या वयाने मोठे असूनही आमच्यातील अंतर त्यांनी क्षणात संपवले आणि संगीताशिवायही आमची मैत्री दृढ झाली. सहल, बाहेर जेवायला जाणे, मैफली ऐकणे, गाण्यांबाबत चर्चा करणे अशा विविध कारणांनी ॠणानुबंध घट्ट झाले.एखादे वेळी अरुभय्या त्यांच्या आवडीची उर्दू गझल ऐकत असत. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून ते त्या गझलेचा भावार्थ समजावून सांगत. समकालीन गायकांच्या गाण्यांचेही ते मनभरून कौतुक करीत. सुरेश वाडकर त्यांना खूप आवडायचे. स्वत: मोठ्या उंचीचे गायक असूनही त्यांनी कायम इतरांचे कौतुक केले. श्रेष्ठ गायक असल्याची आत्मप्रौढी त्यांनी कधीच मिरवली नाही, बडेजाव केला नाही. अरुण दाते यांची प्रत्येक मैफल रंगायची. कोणतेही गाणे आपण पहिल्यांदाच गात आहोत आणि ते चांगलेच सादर झाले पाहिजे, असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असायचा. पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांचे व्यासपीठावरचे दिसणे आणि असणे मी जवळून अनुभवले आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तालीम करायचीच, असा त्यांचा दंडकहोता.एकदा अमेरिकेला आम्ही सात दिवसांत ३३ कार्यक्रम केले. परंतु, एकाही कार्यक्रमात अरुण दाते थकलेले, वैतागलेले दिसले नाहीत. त्यांच्या उत्साही स्वभावामुळे आम्हालाही हुरुप यायचा. प्रवासाची दगदग, थकवा, ताण यांचा त्यांच्या चेहऱ्यावर मागमूसही नसायचा. स्वत: एवढ्या मोठ्या पातळीवर पोहोचल्यानंतरही इतरांचे कौतुक करण्यातून त्यांचा मोठेपणा पदोपदी जाणवायचा. अरुभय्या मुळात इंदूरचे. तेथील खाद्यपदार्थांचे त्यांना विलक्षण कौतुक होते. प्रत्येक पदार्थ ते अत्यंत चवीने खायचे आणि आम्हालाही आग्रहाने खाऊ घालायचे.गजानन वाटवे, मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे अशा दिग्गजांना ते गुरुस्थानी मानायचे. ही माणसे आयुष्यात भेटली नसती, तर मी घडलोच नसतो, अशी त्यांची भावना होती. मागच्या महिन्यात मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांची आजारपणातील अवस्था बघवत नव्हती. निघताना त्यांनी प्रेमाने माझा हात हातात घेतला. तो स्पर्श कायम अरुभय्यांची आठवण करून देत राहील.
अरुभय्यांशी जुळले ॠणानुबंध - अजय धोंगडे, ज्येष्ठ तबलावादक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:13 AM