चाकण : एखाद्या माणसाला रस्त्यात अपघात झाला तर, त्याला वाचवण्यासाठी लोक पुढं येत नाहीत, मात्र एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली हजार-पाचशे लोक रस्त्यावर येतात. याचा अर्थ माणसांना पुतळ्यांबद्दल अधिक संवेदना वाटते, असं प्रतिपादन लेखक अरविंद जगताप यांनी चाकणमध्ये बोलताना केलं. सोशल मीडियामुळे बदललेला समाज, त्यामुळे हरवत चाललेल्या संवेदना यावर जगताप यांनी भाष्य केलं. एका व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. त्यांनी यावेळी वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. औद्योगिकरणात वाढ झाल्यानं चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वाढली आहे. याशिवाय महामार्गांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर झाला आहे, असं आयुष प्रसाद यांनी म्हटलंय. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, सचिव अतुल वाव्हळ, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष सुहास गोरे, नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, मोतीलाल सांकला, सुधीर काकडे, चंद्रकांत गोरे, भगवान घोडेकर, विनय भुजबळ, नितीन पाटील, संदीप बागडे, दीपक करपे, सुशीला सातव, संभाजी सोनवणे, जगन्नाथ कांडगे, गोपाळराव जगनाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माणुसकी हरपली... आता माणसांपेक्षा पुतळ्यांबद्दल अधिक संवेदना- अरविंद जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 9:04 PM