पिंपरी : गाडी हळू चालवा, असे प्रवासी म्हणाला. त्यावरून वाहनचालकाने वाद घालत प्रवाशाचा मोबाईल फोन व रोख रक्कम, असा ११ हजारांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन चोरून नेला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मावळ तालुक्यातील गहुंजे गावच्या हद्दीत पुलाखाली १२ नोव्हेंबरला ही लुटमारीची घटना घडली. रवीकुमार लीलानंदामूर्ती पुला (वय ४३, रा. नेताजीनगर, अनंतपुर, आंध्र प्रदेश) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. १२) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चारचाकी वाहनाच्या अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेअरिंग चारचाकी वाहनाने तळेगाव दाभाडे येथील उर्से टोलनाका येथून पुण्याकडे जात होते. त्यावेळी चारचाकी वाहनाचा चालक हा वाहन जोरात चालवत होता. गाडी हळू चालवा, असे फिर्यादी त्याला म्हणाले. त्यावरून फिर्यादी व वाहन चालक यांच्यात बाचाबाची झाली. त्याचा राग मनात धरून वाहन चालकाने गहुंजे पुलाखाली गाडी थांबवली. मला शिवाजीनगरला जायचे आहे, असे सांगून फिर्यादीला वाहनातून उतरविले. तसेच फिर्यादीच्या शेवटच्या खिशातील नऊ हजार रुपये रोख व दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ११ हजार रुपये किमतीचा ऐवज आरोपीने जबरदस्तीने घेऊन चोरून नेला.