पिंपरी : आळंदी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात काम करणार्याकडे १० लाखांची खंडणी मागितली. तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार करीत गळ्यातील सोन्याची चैनही हिसकावून नेली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिघीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर दत्तात्रय निकम (वय ३६, रा. गणपतराव काजळे मळा, प्रिक्रमसिटी, वॉलेट बिल्डींग, चर्होली) असे मारहाणीत जखमी झालेल्यांचे नाव असून त्यांनी गुरुवारी दिघीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुड्ड्या उर्फ अनिकेत संजय मेटकर (वय २३), वात्या उर्फ महेश दिलीप कासार (वय २४, दोघेही रा. काळेवाडी), सोन्या मोरे (वय २०), बाळ्या उर्फ बालाजी अडकिने (वय २०, पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे काव्या लॉजमध्ये झोपलेले असताना आरोपी मेटकर याने फिर्यादीकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करीत त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर कोयत्याने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी झालेल्या सांगर निकम यांच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची दोन लाख ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावली. इतर आरोपींनी निकम यांना दगडाने मारहाण केली. तसेच आरोपी अडकिने याने काउंटर वरील कामगारांना डोक्यात ६ ते ७ गोळ्या घालून मारुन टाकील अशी धमकी देऊन गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने घेऊन गेले.