पिंपरी : मिळकत थकविलेल्या ११२ मिळकतधारकांना पालिकेने मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली असून, कारवाईच्या भीतीने पाच दिवसांत ५१ थकबाकीदारांनी तब्बल पावणेदोन कोटींचा भरणा केला आहे. नोटीस बजावूनही भरणा न केल्यामुळे दोन मिळकतधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून मिळकतकराची थकबाकी असलेल्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या १४ विभागीय कार्यालयांकडून ही वसुली व कारवाई सुरु आहे. संबंधित ११२ मिळकतधारकांना पालिकेने जप्तीच्या नोटीस पाठविल्या होत्या. यापैकी गेल्या पाच दिवसात ५१ थकबाकीदारांनी १ कोटी ७३ लाख ९८ हजार ९५१ रुपयांचा भरणा केला आहे. भोसरी विभागीय कार्यालयात ३६ लाख ४९ हजार तर थेरगाव विभागीय कार्यालयात ३६ लाख १५ हजारांचा भरणा झाला आहे. चिखली कार्यालयात २१ लाख ५८ हजारांचा भरणा झाला आहे. थकबाकीदारांकडून वसुली होत असल्याने मिळकतराच्या एकूण उत्पन्नातही वाढ होत असून, बुधवारपर्यंत हा आकडा ३६१ कोटी २७ लाखांवर पोहोचला आहे. नोटीस देऊनही कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरु आहे. बुधवारी पिंपरीतील एका मिळकतधारकाने ५६ लाखांचा मिळकत कर थकविल्याने त्याची मालमत्ता जप्त केली. (प्रतिनिधी)
दोन जणांची मालमत्ता महापालिकेकडून जप्त
By admin | Published: March 17, 2016 3:16 AM