पिंपरी : तक्रारी अर्ज आणि पोस्ट मार्टम नोट्स आणि इतर कागदपत्रांसाठी ५० हजार रूपयांची लाच मागितली. यातील पाच हजार रूपयांची लाच घेताना चिंचवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक विठ्ठल अंबाजी शिंगे, ( वय ५७ ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. ही कारवाई बुधवारी वाल्हेकरवाडी पोलीस चौकी येथे करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना यांच्या भावाविरूद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात असलेला तक्रारी अर्ज, भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम नोट्स आणि इतर कागदपत्रे पाहिजे होते. ही कागदपत्रे देण्यासाठी विठ्ठल अंबाजी शिंगे यांनी ५० हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार आणि शिंगे यांच्यात तडजोड झाली. तडजोडीनंतर शिंगे यांनी २५ हजार रूपयांची मागणी केली. त्यापैकी ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
पुणे युनिटचे पोलीस निरिक्षक श्रीराम शिंदे या घटनेचा तपास करीत आहेत. पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शानाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
शासकीय, अधिकारी, लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागान पुणे, कार्यालयास हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे, ०२०-२६१२२१३४, २६१२२१३४, २६०५०४२३, व्हॉट्स-ॲप क्रमांक पुणे - ७८७५३३३३३३, या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.