पिंपरी : मुंबईकडून-पुण्याकडे जाताना निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील उतारावर द्रवरूप गॅसने भरलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकून पलटी झाला. हा अपघात रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास झाला. त्यात एक जण जखमी झाला. तर गॅस गळती रोखण्यासाठी गॅस कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे बारा तास प्रयत्नांची शिकस्त केली. त्यानंतर गॅस गळती रोखण्यात यश आले.
राजेंद्र प्रसाद यादव (वय ५३, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) असे अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग जातो. दापोडीपासून ते भक्ती-शक्ती चौकापर्यंत या मार्गावर ट्रक, टँकर, ट्रेलर जाण्यासाठी ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला आहे. या मार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती पूल संपल्यानंतर आणि मधुकर पवळे उड्डाणपूल सुरू होण्याच्या पूर्वी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. प्राधिकरणाच्या बाजूकडील लेनचे काम पूर्ण झाले आहे. तर यमुनानगरच्या बाजूचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाताना पुलावरून खाली आल्यानंतर शंभर मीटरवर वळण आहे.
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास भरधाव टँकर मुंबईकडून-पुण्याकडे जाताना निगडीतील भक्ती-भक्ती उड्डाणपुलावरून उतरताना वळणाचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला लेनवर पलटी झाला. या टँकरमध्ये १७.८०० टन द्रवरूप गॅस भरलेला होता. त्यामुळे छोटीशी गॅस गळती सुरू झाली.
गॅस गळती रोखण्याचे मोठे आव्हान
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दाखल झाले. त्यांना गळती होत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनीला कळविले. त्यानंतर कंपनीचे पथक आले. त्यांनी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यास सुरूवात केली. त्यानंतर लिकेज हे ज्या बाजूने टँकर पडला आहे. त्याच बाजूने होते. त्यामुळे गळती रोखण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर होते.
पावसामुळे मदतकार्यात अडथळे
पाच क्रेन मागविण्यात आल्या. त्यातच अधून-मधून जोरदार पाऊस येत होता. त्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. तर गॅस पसरू नये, यासाठी पाण्याचे फवारे टँकरवर सोडण्यात येते होते. त्यानंतर सुमारे बारा तासांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास गॅस गळती थांबविण्यात यश आले. त्यानंतर टँकरमधील उर्वरित गॅस दुसऱ्या टँकरमध्ये टाकण्यात आला. अखेर धोका टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.