- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : शहरात मागच्या आठवड्यापासून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्यात विविध क्रीडाप्रकारांतील खेळांच्या स्पर्धा सुरू आहेत. महापालिकेच्या शाळेपेक्षा खासगीतील विद्यार्थीच जास्त पारितोषिके मिळत आहेत. यावरून महापालिकेच्या क्रीडा विभागाची शहरातील खेळाडूंविषयीच्या अनास्थेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. या असुविधेबद्दल शहरातील खेळाडूंसह क्रीडाशिक्षकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारने प्राथमिक शाळांच्या गुणवत्तावाढीबरोबर इतरही अनेक गोष्टींकडे लक्ष देत सर्व शिक्षा अभियानाबरोबर क्रीडाविषयक अभ्यासक्रमालाही महत्त्व दिले आहे. परंतु शहरातील महापालिकेच्या आणि शासकीय शाळांना क्रीडांगणच नाही तर काही शाळांना तटपुंजे क्रीडा मैदान असल्याने विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती होत नाही. तर शासनाच्या धोरणाला एक प्रकारे महापालिका व शाळा व्यवस्थापन हारताळ फासताना दिसून येत आहे.
शाळांना नाही मैदान...
शहरातील बहुतांश महापालिकेच्या शाळेला मैदान नसल्याने येथील विद्यार्थ्यांना खेळाच्या विविध प्रकारांचा सराव करता येत नाही. शाळेसमोर खूप छोटी जागा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होत असला तरी शारीरिक विकास व कसरती करण्यासाठी ज्या मैदानाची आवश्यकता आहे ते नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
समाविष्ट गावांच्या पदरी निराशाच..
वीस-बावीस वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या उपनगरांतील विकासकामांच्या आराखड्यानुसार खेळाच्या मैदानाचे आरक्षणाचे घोंगडे भिजत पडले आहे. या सर्व समाविष्ट भागांत खेळाचे मैदानाकरिता प्रत्येकी तीन ते चार खेळाच्या मैदानासाठी आरक्षणे राखीव आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे मैदानाकरिता आरक्षित असलेल्या जागेचा प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने युवा खेळाडूचे उज्ज्वल भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे.