पिंपरी : पीन कोडव्दारे एटीएम मशीन उघडून रोकड काढली. त्यानंतर आपली ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये आग लावली. मात्र, पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरोडा विरोधी पथक आणि युनिट पाचच्या पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड आणि चारचाकी वाहन, असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तळेगाव दाभाडे येथील क्रांती चौक येथे १४ जुलै रोजी ही घटना घडली होती.
किरण रवींद्र महादे (वय २७, रा. संगमवाडी, खडकी), योगेश रामदास वाळुंज (वय २९, रा. आळंदी), बाबासाहेब भोमाजी वाळुंज (वय ३१, रा. पारनेर, अहमदनगर), मुंजाजी मारोतराव चंदेल (वय ३२, रा. मेदनकरवाडी, चाकण), अशोक गजानन पोतदार (वय ३५, रा. परांडे कॉलनी, दिघी), भगवान अशोक थोरात (वय २१, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १४) रात्री क्रांती चौक, तळेगाव येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्याने पाच लाख ८२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी विशाल संपत्ती कसबे (वय ३१, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवले. एटीएम मशीनमध्ये पैशांचा भरणा करणाऱ्या कंपनीतील कामगारांवर पोलिसांना संशय आला. त्यानुसार, किरण महादे आणि चालक म्हणून काम करणारा योगेश वाळुंज यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात तफावत आढळली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी इतर आरोपींशी संगणमत करून गुन्हा केल्याची कबुली दिली.
सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, प्रशांत अमृतकर, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर फवारला स्प्रे
आरोपींनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे फवारला. त्यानंतर पीन कोडव्दारे एटीएम मशीनचा ड्रावर उघडून रोकड चोरी केली. आपली ओळख पटू नये म्हणून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी डिझेल टाकून एटीएम सेंटरमध्ये आग लावली. मात्र, पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.