पिंपरी :चोरीसाठी गॅस कटरने एटीएम मशीन कट करण्याचा प्रयत्न केला. यात मशीनने पेट घेतला. यात एटीएममधील तीन लाख ९८ हजार ७०० रुपयांची रोकड जळून खाक झाली. एचडीएफसी बॅंकेच्या कुदळवाडी येथील एटीएममध्ये रविवारी (दि. १२) रात्री अडीच ते पहाटे तीन या कालावधीत ही घटना घडली.
अमोल दिगंबर शिंदे (वय ४२, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १२) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बॅंकेचे कुदळवाडी येथे एटीएम आहे. या एटीएममध्ये अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री अडीचच्या सुमारास प्रवेश केला. त्यानंतर तेथील सीसीटी कॅमेऱ्यांना काळा स्प्रे मारला. एटीएम मशीनच्या उजव्या बाजूचा एटीएम वाॅल्ट सेफ डोअर गॅस कटरच्या साह्याने कापण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मशीनने पेट घेतला. त्यामुळे एटीएम मशीन, दोन एसी युनिट, दोन सीसीटीव्ही कॅमेरे, लाॅबी लाईट सिलींग व साईड वाॅल फर्निचर तसेच एटीएम मशीनमधील तीन लाख ९८ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपिनरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.