तळेगाव : सुदुंबरे गावच्या हद्दीत २१ मे रोजी सकाळी प्रातर्विधीस गेलेल्या दोन अल्पवयीन आदिवासी मुलींवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. त्यात एकीचा मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. या गुन्ह्यातील महेंद्र ऊर्फ कुमार दत्तू तळपे (वय २४, रा. वाशिरे, तळपेवस्ती, ता. खेड, जि. पुणे) या आरोपीला मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठाणे परिसरात गुरुवारी सायंकाळी जेरबंद केले. गुन्ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपास सुरू आहे. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीवरून, सुदुंबरे गावच्या हद्दीत २१ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास ऋतुजा काळुराम कुसुमकर (वय १४) व पायल संतोष जगताप (वय ७) या प्रातर्विधीसाठी लगतच्या शेतात गेल्या होत्या. त्या मुलींवर आरोपी तळपे याने धारदार चाकूने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यात पायल जगताप हिचा जागीच मृत्यू झाला, तर ऋतुजा गंभीर जखमी झाली.घटनास्थळाला पोलीस अधीक्षक जय जाधव, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक विवेक पानसरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा निरीक्षक राम जाधव यांनी भेट दिली होती. पोलीस निरीक्षक राम जाधव, सहायक निरीक्षक सतीश होडगर, कर्मचारी राजेंद्र मिरघे, सुनील जावळे, शंकर जम, दत्ता बनसोडे, गणेश महाडिक, विशाल साळुंखे, चंद्रकांत बागवडे, रऊफ इनामदार यांच्या पथकाने गुप्त माहिती व खबऱ्यामार्फत माहिती घेऊन आरोपी महेंद्र तळपे याला गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (वार्ताहर)
हल्ला करणारा अटकेत
By admin | Published: June 04, 2016 12:22 AM