पिंपरी : किरकोळ कारणावरून वाद झाल्याने दोन जणांनी गोळीबार केला. त्यामुळे घाबरून जाऊन लोकं सैरावैरा पळून गेली. खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी सहा तासांत जेरबंद केले. आझाद चाैक, निगडी येथे रविवारी (दि. २०) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
राहुल यलप्पा सोनकांबळे (वय २५), सुरज सुभाष पवार (वय २७, दोघेही रा. ओटास्किम, निगडी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह प्रशांत रमेश कोळी (वय ३२, रा. ओटास्किम, निगडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भरत ज्ञानोबा थोरात (वय २८, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी हे त्यांचा मोठा भाऊ संतोष थोरात यांच्यासह काही जणांसह गप्पा करीत होते. त्यावेळी आरोपी सुरज पवार याने फिर्यादी यांना भाई म्हणून आवाज दिला. त्यामुळे संतोष थोरात याला राग आला. तो काही भाई वगैरे नाही, असे संतोष म्हणाला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. गोळ्या घालतो, तुम्ही पाच मिनिटं थांबा, असे रफिक खान व संतोष यांना म्हणून आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास आरोपी तेथे परतले. त्यावेळी आरोपी प्रशांत कोळी व सुरज पवार यांच्या हातात पिस्तूल होते. तुला आता ठोकतो, गोळ्या घाला यांना, असे म्हणून आरोपी कोळी याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या दिशेने एक गोळी झाडली. तसेच आरोपी पवार यानेही एक गोळी झाडली. त्यामुळे फिर्यादी व इतर सर्वजण सैरावैरा पळून गेले. तसेच आरोपीही तेथून पळून गेले.
आरोपी तळवडे येथे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी सोनकांबळे व सुरज पवार यांना पोलिसांनी पकडले. त्यांचा साथीदार प्रशांत कोळी याच्यासह गुन्हा केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.