पिंपरी : शहर परिसरात रस्त्यात अडवून शिवीगाळ करून सासूला मारण्याची धमकी देऊन लोखंडी टॉमीने डोक्यात मारून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी जावयावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. इंगवले चौक, पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजी संजय लोंढे उर्फ पप्या (रा. पिंपळे निलख), असे आरोपी जावयाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक हेमा सोळंंके यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सविता विकास धुताडमळ, असे गंभीर जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी असलेल्या सविता धुताडमळ या आरोपी शिवाजी लोंढे याच्या सासू आहेत. आरोपीने त्याच्या लहान मुलास मारहाण केली. त्यामुळे सासू सविता धुताडमळ यांनी आरोपी जावई शिवाजी लोंढे याला त्याबाबत जाब विचारला. त्याचा राग मनात धरून आरोपीने सासू सविता यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तुला खल्लास करून टाकतो, असे आरोपी हा सासू सविता यांना म्हणाला. त्यानंतर लोखंडी टॉमीने डोक्यात, चेहऱ्यावर व इतर ठिकाणी मारून सासू सविता यांना गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
गंभीर जखमी झाल्याने सासू सविता धुताडमळ या बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळंके यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिवाजी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे तपास करीत आहेत.