पिंपरी : महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने महापालिकेला आवाहन केले आहे. निवडणूक लढविताना उमेदवारांसमोर अनेक प्रश्न असतात. आचारसंहिता आणि त्यातील नियमावली, काय करावे आणि काय करू नये, याविषयी मार्गदर्शन करणारी मालिका आजपासून सुरू करणार आहेत. साधारण वर्तणूक कशी असावी, यासंदर्भात नियमावली घालून दिली आहे. कोणताही पक्ष अथवा उमेदवार वेगवेगळ्या जाती आणि धार्मिक किंवा सामाजिक गट यांच्यात मतभेद होणार नाही, परस्परांमध्ये तणाव निर्माण होईल, याबाबत दक्षता घ्यावी. राजकीय पक्षांवर टीका करण्यात येईल तेव्हा ती पक्षाची धोरणे किंवा कार्यक्रम त्यांचे पूर्वीचे कार्य यांच्यापुरती मर्यादित असेल. पक्षाच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कामाशी संबंधित नसलेल्या खासगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूंवर टीका करण्यापासून उमेदवार दूर राहतील. बिनबुडाचे आरोप करू नयेत. सामाजिक शांतता अबाधित राहील याची दक्षता राजकीय पक्ष आणि नेत्यांनी घ्यावी. मते मिळविण्याकरिता जात, धर्म, पंथ यांना आवाहन केले जाणार नाही. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जाणार नाही. विशिष्ट जाती-धर्माच्या सभा घेऊ नयेत. मतदारांना लाच देणे, वस्तुवाटप करणे, धाक दाखविणे, दोनशेमीटर क्षेत्रात प्रचार करणे, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर प्रचार करणे, सभा घेतल्यास कारवाई करण्यात येईल. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सभा घेणे, मतदारांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था केल्यास भ्रष्टाचार आणि निवडणूक कायद्यांतर्गत गुन्हा समजला जाईल.(प्रतिनिधी)
प्रतिस्पर्ध्यावरील टीकेवरही लक्ष
By admin | Published: January 14, 2017 2:56 AM