गाव ते महानगर, मेट्रोसिटी आणि आता स्मार्ट सिटी अशी पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराचा समावेश स्मार्ट सिटीत केला आहे. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट करीत असताना आजुबाजूची हिंजवडी, चाकण, तळेगाव ही उपनगरेही स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. प्रयत्न होतातहेत, त्यास गती मिळायला हवी. पिंपरी-चिंचवड या शहराची वाटचाल स्मार्टसिटीच्या ऐकेकाळी शिक्षणाचे माहेर समजले जाणाऱ्या शहरातील शिवारालगतचा पिंपरी-चिंचवड हा गावांचा भाग आता आयटी, औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत आहे. यामुळे तळेगाव, चाकण, हिंजवडी या आजूबाजूच्या परिसराचाही नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. पिंपरीच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, संजय भेगडे आणि पीएमआरडीएचे प्रमुख महेश झगडे, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने शहरास मोठ्या अपेक्षा आहे.नुकतीच पीएमआरडीए चीही स्थापना झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पुण्यालगत असलेल्या उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या दृष्टीने हे सूचक आणि परिणामकारक असे पाऊल आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या माध्यमातून कालबद्ध असा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. नुसता कार्यक्रम न आखता त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होईल, यादृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचाही विचार करण्याची गरज आहे.शहराचे सौंदर्य वाढविण्याचे काम जसे महापालिकेने केले, तसेच येथील विविध बांधकाम व्यावसायिकांनीही केले आहे. मोठे-मोठे आकाशाला गवसणी घालणारे, आणि अगदी स्वप्नवत वाटणारे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी लगत असणाऱ्या हिंंजवडी, रावेत वाकड परिसराचाही विकास वेगाने होत आहे. विविध परिसरात व्यावसायिक बाजारपेठा, मॉल, मल्टिप्लेक्स, पंच तारांकित हॉटेल, शैक्षणिक संकुले, डोळे दीपविणाऱ्या बागा, उद्याने, सभागृहे, नाट्यगृहे विकसित झाल्याने नवा लुक आला आहे. विकास होत असला तरी वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहरांचे पुढील पंचवीस ते पन्नास वर्षांचा कालखंड लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे आहे. मेट्रोला गती मिळाली आहे. आता रिंग रेल्वे, स्काय बस हे प्रकल्प लवकरात लवकर राबविण्याची गरज आहे. लोकसंख्या लक्षात घेता रस्ते हे प्रशस्त तर हवेच त्याचबरोबर, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, हलकी वाहने, जड वाहने यासाठी स्वतंत्र लेन असायला हव्यात. हिंजवडी ते लोहगाव विमान तळ हा मेट्रो मार्गही लवकर व्हावा.
कृष्णकुमार गोयल(लेखक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व कोहिनूर समूहाचे प्रमुख आहेत)