देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या येथील महात्मा गांधी हिंदी प्राथमिक शाळा व डॉ.झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता. देहूरोड बाजारपेठेतील हिंदी व उर्दू प्राथमिक शाळेत प्रदर्शनाचे उद्घाटन कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप व उपाध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण यांच्या हस्ते झाले. शिक्षण समिती अध्यक्ष ललित बालघरे, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, सारिका नाईकनवरे, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, हिंदी प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका छाया कदम, ऊर्दू शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका निशांत शेख , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व पालक उपस्थित होते. प्रदर्शनात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते. विद्यार्थ्यांनी नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेले एटीएम यंत्र, टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले दुचाकी, प्रदूषण करण्याच्या सवयी व उपाय, स्वच्छता अभियानावर आधारित प्रकल्प आदी पन्नासहून अधिक प्रकल्प साकारले होते. हा उपक्रम वैज्ञानिक दृष्टी देणारा ठरणार असून, विद्यार्थ्यांनी सर्व प्रकल्प अत्यंत कल्पकतेने साकारल्याच्या भावना व्यक्त करून सानप यांनी कौतुक केले. प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रकल्पांची सानप यांनी स्वत: निवड केली. बक्षीस समारंभ कार्यक्रमात प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रकल्पांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. पहिली ते आठवीच्या विविध क्रीडा स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक निशांत शेख यांनी केले, मुस्कान शेख व सत्यम मौर्य या मुलांनी सूत्रसंचालन केले. जयश्री चौधरी यांनी आभार मानले. छाया कदम, राजश्री कामथे यांनी संयोजन केले. हिंदी व उर्दू प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी संयोजनासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष
By admin | Published: January 23, 2017 2:46 AM