पिंपरी : शहरात मागील वर्षी १० मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मार्च ते मे या काळात रुग्णसंख्या आटोक्यात होती. मात्र, त्यानंतर जूनपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यात शहरात २८ हजार १७३ रुग्णांची नोंद झाली. तर ५४७ रुग्णांचा मृत्यू झाला. यंदाचा ऑगस्टमध्ये शहरात ५०५१ रुग्णांची नोंद झाली, तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक ठरला आहे. तसेच मागील वर्षी पॉझिटिव्ही रेट हा २५ टक्के होता, तर यंदा ३.२४ टक्के आहे. तसेच यंदा बरे होण्याचे प्रमाण ९. ९७ टक्के आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये पिंपरी-चिंचवड बरोबरच जिल्ह्याभरात कोरोना रुग्णांची जास्त होती. परिणामी शहरात उपचार घेण्यासाठी पुण्यासह जिल्हाभरातून रुग्ण येत होते. त्यामुळे शहरात ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले. यंदा मात्र शहरात रुग्णसंख्या कमी झाल्याने शहरातील महापालिका रुग्णालयात बेड रिक्त आहेत. तसेच शहरातील बहुतांश कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. मागील वर्षी शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.
त्यानंतर ऑक्टोबर ते यंदाच्या जानेवारीपर्यंत रुग्णसंख्या कमी होती. शहरातून कोरोना हद्दपार झाला अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु अचानक फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. यंदाच्या वर्षी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. सद्य:स्थितीत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. परिणामी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु पुढील काही महिन्यांत संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तपासण्यांचे प्रमाण अधिक
मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा उच्चांक असताना त्यावेळी महिन्याभरात कोरोनाच्या १११२५० तपासण्या करण्यात आल्या होत्या. यंदाच्या ऑगस्टमध्ये १५५८०० तपासण्या करण्यात आल्या आहेत. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तपासण्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.