पिंपरी : महापालिकेतील वैद्यकीय अधीक्षक पदावरून वादंग सुरू झाले आहे. बदल्यांच्या अर्थकारणाविषयी बोलणा-या डॉ. अनिल रॉय यांचे भांडार विभागातील खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत. ‘वैद्यकीय विभागातील खरेदीत सुसूत्रता आणण्यासाठी अधिकार काढल्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेशात म्हटले असले, तरी वैद्यकीय संचालक व वायसीएमचे अधीक्षक या दोन अधिकाºयांचे खरेदीचे अधिकार कायम ठेवले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाच्या अखत्यारित संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह आठ रुग्णालये आणि इतर दवाखान्यांचे कामकाज चालते. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे किंवा साहित्य, तसेच सर्व प्रकारच्या औषधांची खरेदीही आरोग्य वैद्यकीय अधिकाºयांच्या मान्यतेने करण्यात येते. त्यासाठी त्यांना १० लाखांपर्यंतच्या खरेदीचे वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, तर वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे आणि वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना पाच लाख रुपयांपर्यंत खरेदीचे अधिकार आहेत.भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल रॉय यांना पदन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जबाबदारी वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. साळवे यांच्या बढतीविरोधात डॉ. रॉय यांनी न्यायालयात धाव घेतली.दरम्यान, बदली आणि बढतीत अर्थकारण असल्याचा आरोप डॉ. रॉय यांनी केला होता. त्यामुळे रॉय यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. सत्ताधाºयांना आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप चांगलेच झोंबले आहेत. पदाधिकाºयांचा रोष वाढला आहे. त्यातूनच आयुक्तांनी कारवाई केल्याची महापालिकेत चर्चा आहे. रॉय यांच्याकडील वित्तीय अधिकार काढून घेतले आहेत. तथापि, वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांचे वित्तीय अधिकार अबाधित ठेवले आहेत. अशाच प्रकारे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांचेही अधिकार काढून घेतले होते. महापालिका वैद्यकीय विभागामार्फत रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी केली जाणारी औषधे आणि उपकरणांची खरेदी यापुढे मध्यवर्ती भांडार विभागामार्फतच करावी, असा आदेश आयुक्तांनी जारी केला आहे.चव्हाण रुग्णालयासह इतर रुग्णालये आणि दवाखान्यांमधील उपकरणे, साहित्य आणि इतर सर्व प्रकारच्या औषधांची खरेदीही मध्यवर्ती भांडार विभागाच्या मुख्य कार्यालयामार्फत करावी. मध्यवर्ती भांडार विभागाच्या सहायक आयुक्तांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, तसेच संबंधित सक्षम अधिकारी यांच्या मागणीनुसार व नियमानुसार खरेदी प्रक्रिया राबवावी. याची सर्व जबाबदारी भांडार विभागाने घ्यावी. वैद्यकीय विभागाच्या खरेदीसाठी नव्याने तरतूद करेपर्यंत वैद्यकीय विभागासाठी यापूर्वी केलेली तरतूद खर्च करावी. खरेदीसाठी मध्यवर्ती भांडार विभागाच्या सहायक आयुक्तांनी आढावा घेऊन आवश्यकतेनुसार प्रस्ताव सादर करावा, असे आयुक्तांनी बजावले आहे.
वैद्यकीय अधीक्षकांचे अधिकार काढले, सत्ताधारी व प्रशासनाने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:25 AM