पिंपरी : पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहराची पालकमंत्री गिरीश बापट यांना अॅलर्जी आहे का, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसने केली होती. त्यामुळे चिंचवड येथे उभारलेल्या मदर तेरेसा उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री बापट आवर्जुन उपस्थित होते. दोन महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने पीएमआरडीएत प्राधिकरण विलीन होणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर भाजपाच्या शहरातील नेत्यांनी विलीनीकरण होऊ नये, अशी भूमिका मांडली होती; तर काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेनेही विलीनीकरणास विरोध केला होता. तसेच महापालिकेतच प्राधिकरणाचा समावेश करावा, अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडली होती.पीएमआरडीए आणि प्राधिकरण विलीनीकरणाबाबत भूमिका विचारली असता पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘पुण्याचा एकात्मिक विकास साधण्यासाठी पुणे महानगर नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच शहरात दोन प्राधिकरण कसे काय असतील? त्यातून विकास कसा काय साध्य होईल? पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा एकत्रित विकास व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्राधिकरणाचा समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत झाला आहे. प्राधिकरण आणि पीएमआरडीए विलीनीकरण काळाची गरज आहे.’’अनधिकृत बांधकाम शास्ती रद्द करण्यासंदर्भातील निर्णय पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे. त्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. अनधिकृत बांधकाम नियमितीकरणातही सुटसुटीतपणा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्याची लवकरच कार्यवाही होईल, अशी माहिती बापट यांनी दिली.
एकात्मिक विकासासाठी ‘प्राधिकरणा’चे विलीनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:02 AM