तळेगाव स्टेशन : तळेगावात रिक्षाने प्रवास करणे म्हणजे मोठी शिक्षा आहे. रिक्षाचालकांचे मनमानी भाडेवसुलीचे मीटर जोरात असून नियम पायदळी तुडवले जात आहेत. तळेगावात रिक्षा मीटरप्रमाणे चालत नाहीत. ड्रेसकोड, बॅच, बिल्ला आदींची पोलिसांनी सक्ती केली असली, तरी तळेगावमध्ये तिचे पालन होताना क्वचितच दिसते. तळेगाव, घोरावाडी स्टेशन रस्त्यावर सर्वाधिक शेअर रिक्षा चालतात. ओव्हरसिट प्रवासी वाहतूक, पाठीमागील बाजूला जाळी मारूनही त्यातून प्रवासी वाहतूक जोरात सुरू आहे रेल्वे स्टेशनजवळील बसस्थानकात आत जाऊन रिक्षा प्रवासी घेतात. स्थानकासमोरील गेटबाहेर रिक्षा थांबून असतात.
तळेगाव स्टेशनपासून स्वप्ननगरीत गेटवर जाण्यासाठी रिक्षाचालक ५० रुपये भाडे आकारतात, तर सोसायटीत सोडायचे असल्यास १० रुपये जास्त घेतात. मेडिकल कॉलेज, डीवाय पाटील कॉलेज आंबीच्या विद्यार्थ्यांची, तर रिक्षाचालक मोठी लूट करतात; परंतु या महाविद्यालयात परिसरात जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने विद्यार्थी लूट सहन करतात. तळेगावात बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवासाची संख्या जास्त आहे.रेल्वे स्थानकाबाहेरील काही रिक्षाचालक बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना या परिसरातील माहिती नसल्याने वाटेल ते भाडे आकारतात. तळेगाव पोलीस स्टेशन या परिसरात वारंवार दुचाकीचालकांना अडवून त्यांचा परवाना किंवा इतर कागदपत्रांची मागणी करतअसतात. त्याचप्रमाणे त्यांनी रिक्षाचालकांची देखील तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .रिक्षाचालकांच्या अशा वाढत्या मनमानीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत . या प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही समावेश असतो. त्यामुळे ते रिक्षाचालकांच्या अशा दांडगाईला अधिक बळी पडतात. पण वाद नको म्हणून असे प्रवासी जास्त वाद न घालता रिक्षाचालक मागेल तेवढे पैसे देऊन मोकळे होतात. तळेगाव वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांच्या या मनमानीकडे लक्ष द्यावे आणि त्यांना समज द्यावी, अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे.अवैध प्रवासी वाहतूक : व्यवसायाला अडचणशहरातील परवानाधारक रिक्षाचालक व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करत आहेत. परिवहन खात्याच्या खुल्या धोरणामुळे अनेक नवीन रिक्षा वाढत असताना आणि अवैध प्रवासी वाहतुकीमुळे व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शहरांतर्गत रस्त्याची अवस्था, आजूबाजूची संलग्न गावे, वाड्या-वस्त्या व रिक्षा थांब्यावरून भाडे मिळण्याचा कालावधी याचा विचार करून भाडेपद्धत ठरली आहे.मीटरप्रमाणे भाडे मिळाल्यास उत्तमच राहील.परंतु प्रवासी उतरल्यावर दुसरे भाडे त्याच ठिकाणी मिळत नाही. म्हणून प्रवासी व चालक यांना परवडणारा दर घेतला जातो. काही अप्रामाणिक रिक्षाचालक आहेत त्यांची चौकशी व्हावी. भाडे नाकारणे, अडवणूक करणे, उद्धट वर्तन करणाºयाविरुद्ध पोलीस कारवाई व्हावी. प्रवाशांची सेवा हाच आमचा धर्म असे ध्येय तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघटनेचे आहे, असे तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोळस यांनी सांगितले.