पिंपरी: जमीन विक्री व्यवहारातील रक्कम देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे आक्टाेबर २०१८ ते २६ मे २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
अमित देवराम कलाटे (रा. वाकड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह बंटी कलाटे (रा. वाकड) याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. रजिया बाबूभाई मुलाणी (वय ४८, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २६) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रजिया यांचा विश्वास संपादन केला. त्यांना एक कोटी १५ लाख रुपयांचा मोबदला देण्याचे ठरवून त्यांच्या ६८ आर जमिनीच्या खरेदीखतावर सह्या घेतल्या. त्यानंतर खरेदीखतामधील भरणा तपशीलाचे पान बदलून त्या खरेदीखतामध्ये नोंद केल्याप्रमाणे विसार रोख रक्कम व १५ धनादेश न देता दुसरेच धनादेश अमित कलाटे या नावाचा व रकमेचा कोणताही मजकूर नसलेले धनादेश देऊन जमीन विक्रीची ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तसेच सदर मिळकतीमधील २८ गुंठे साठेखताने तिऱ्हाईत व्यक्तिस विकली. तसेच सदर व्यवहारातील रक्कम मागितली असता आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.