पुणे : केंद्र सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याविरोधात ‘लोकायत’ व सोशालिस्ट पार्टीच्या (इंडिया) वतीने शनिवारी सायंकाळी मंडई परिसरात जनजागृती करण्यात आली.‘लोकायत’कडून नेहमी विविध विषयांवर या परिसरात जनजागृती केली जाते. या वेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम लोकांशी चर्चा करून त्यांना या प्रस्तावित भूसंपादन कायद्याबाबत, त्यातील शेतकरीविरोधी तरतुदींबाबत माहिती दिली. नंतर गाणी, भाषण आणि घोषणांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारच्या जनहितविरोधी व ठरावीक उद्योजकधार्जिण्या धोरणांवर टीका करण्यात आली. या वेळी ‘लोकायत’च्या अलका जोशी म्हणाल्या, ‘‘या प्रस्तावित भूसंपादन विधेयकाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी उद्योगपतींच्या घशात घालण्याचे धोरण अमलात येणार आहे. हे विधेयक शेती आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. केंद्राच्या धोरणांमुळे आधीच शेतीक्षेत्राचे गंभीर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आता हे भूसंपादन विधेयक नव्याने सादर करण्यासाठी सरकारने फेरअध्यादेश जारी केला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास कवडीमोल किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची सूट खासगी कंपन्यांना मिळेल आणि आधीच संकटात असलेला शेतकऱ्याचा पाय अधिक खोलात जाईल.’’(प्रतिनिधी)
भूसंपादन विधेयकाविरोधात ‘लोकायत’ची जागृती
By admin | Published: April 05, 2015 12:41 AM