पिंपरी : राज्यांसह विविध देशातील बड्या उद्योजकांनी पिंपरी-चिंचवड औद्योगिक विभागात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्याची गुंतवणूक केली आहे़ मात्र भौतिक सोयी-सुविधांची दुरवस्था असल्याने लघू, मध्यम आणि बड्या उद्योजकांमध्ये नाराजी आहे. विजेचा लपंडावामुळे अनेक उद्योजकांना आर्थिंक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावाबरोबरच काररखान्यात अचानक वीज गायब होणे, वेळेवर माल न मिळाल्याने दंडाची पावती मिळणे, जागोजागी रस्त्यांची झालेली चाळण, पथदिव्यांची गैरसोय, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सोय नाही, औद्योगिक विभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य, मल:निस्सारणाची सोय नसणे, पदपथावर पार्किंग अशा अडचणींचा सामना कामगारांसह छोट्या-मोठ्या उद्योजकांना सहन करावा लागत आहे़औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी पोलीस ठाणे, आरोग्यकेंद्र, सार्वजनिक बगीचा, शाळा, महाविद्यालय अशा सुविधा असणे गरजेचे आहे़ शहरातील भोसरी औद्योगिक सेक्टर ७ तसेच ब्लॉक ए, बी, सी आणि डी या बहुतांश विभागात अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत़ अनेक ठिकाणचे पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने या परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे़ औद्योगिक विभागातील अनेक कंपन्याच्या वतीने महापालिकेला विविध योजना राबविताना महसूल दिला जातो़ तरीही कारखान्यांच्या हद्दीत मल:निस्सारण सोय नाही. कंपन्यांच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ सार्वजनिक स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने कंपन्यातील कर्मचारी उघड्यावर जावे लागते. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्थित सोय नसल्याने डास, दुर्गंधी, दलदल होत आहे़ (वार्ताहर)
मूलभूत सुविधांअभावी भुर्दंड
By admin | Published: September 30, 2016 4:48 AM