पिंपरी: मती भ्रष्ट आणि क्रिया नष्ट भोंदूबाबा उर्फ बागेश्वर शास्त्री यांच्या अध्यात्मिक उचापती सुरू आहेत. संत आणि संत चरित्रांची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी, भ्रमिष्ट, निंदक तुकोबारायांच्या वेळेला होते. आकाश एवढ्या विश्वव्यापक चरित्रावर थुंकण्याचा संतापजनक वेडेपणा करून आपल्या भोगेश्वरी संत पणाचे दिवाळी काढले आहे, अशी टीका संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप संभाजी महाराज देहूकर यांनी केली आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बागेश्वर शास्त्रीमहाराज यांनी काही महिन्यांपूर्वी संत तुकाराम महाराज यांचे विषयी वादग्रस्त विधान केले होते. बागेश्वर शास्त्री महाराज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे संत तुकाराम महाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार महाराजांचे दहावे वंशज ह भ प संभाजी महाराज देहूकर यांनी घेतला आहे.
देहूकारांची सडकून टीका
हभप संभाजी महाराज देहूकर म्हणाले, ''नसून असलेला आपला आध्यात्मिक किंवा संप्रदायात मोठे मिरवण्यासाठी संत आणि संत चरित्रांची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी भ्रमिष्ट निंदक तुकोबारायांच्या वेळेला होते. आज सुद्धा आहेत, हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे दुर्दैवी म्हणावे लागेल. शुद्ध, सात्विक वारकरी भागवत सांप्रदाय विटाळण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या तथाकथित पाठीराख्यांची उठाठेव आज सुद्धा पुण्यनगरीत चालू आहे. आकाशा एवढ्या विश्वव्यापक चरित्रावर थुंकण्याचा संतापजनक वेडेपणा करून आपल्या भोगेश्वरी संतपणाचे दिवाळी काढले आहे.
तुका म्हणे, ':ज्याच्या बापा नाही टाळ, तो देखे विटाळ संता- अंगी ' , संसाराबरोबर तुकाराम महाराजांच्या परमार्थाची साथसंगत करणारी मातोश्री जिजाऊ माऊली त्यांच्या आध्यात्मिक विचारांची सावली होती. संत तुकाराम महाराज जेवल्याशिवाय पाणीसुद्धा पिणारी मातोश्री, जिजाऊ माऊली आहे. ती माउली तुकोबारायांनी काठीने मारत होती म्हणून ते भजनासाठी डोंगरावर जात होते. असला अजब खोडसाळपणाचा शोध लावून तुकोबारायांचा मत्सर आणि निंदा केली. हा बागेश्वर महाराज यांचा आततायी मूर्खपणा कोणालाच मान्य नाही . एक अध्यात्मिक सत्याचा खून करून असत्याचा डांगोरा पेटणाऱ्या भोंदूबाबाचा निषेध मी वंशज म्हणून करीत आहे. समस्त वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून धिक्कार आहे.