लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर झाला आहे. १५ हजार रुपयांच्या जामिनावर तीनही आरोपींची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील ‘३०७’ हे कलम देखील कमी करण्यात आले.
चिंचवड येथील एका कार्यक्रमासाठी शनिवारी (दि. १०) सायंकाळी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी गेले असता त्यांच्यावर शाईफेक झाली. याप्रकरणी पोलिसांनी समता सैनिक दल संघटक मनोज भास्कर घरबडे (वय ३४, रा. पिंपरी), सदस्य धनंजय भाऊसाहेब इजगज (वय २९, रा. चिंचवड), वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओव्हाळ (वय ४०, रा. चिंचवड) या तिघांना अटक केली होती. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणी खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा यासह विविध कलमान्वये चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शाईफेक प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने याबाबत विविध स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यातील खुनाच्या प्रयत्नाचे कलम काढण्याबाबत न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी (दि. १४) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. चौकशीमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्याची आवश्यकता नसल्याचे समोर आले. त्यानंतर ते कलम काढण्यात आले.