वडगाव मावळ : शनिवारी होणा-या बकरी ईदची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून तालुक्यातील मस्जिदीत ईदच्या नमाजसाठी विविध ट्रस्टनी पावसाचा अंदाज घेत नियोजन केले आहे. यावर्षीची ईद वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा उच्चशिक्षित तरुणांचा प्रयत्न आहे. मुस्लिम कुटुंबीयांंनी स्नेहीजनांसाठी मेजवानीची तयारी केली करताना समाजातील गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.अल्लाहाविषयीची श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेची भावना समर्पणातून व्यक्त करण्यासाठी तरुणांनी एकत्र येत बकरी ईद आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कुर्बानीची परंपरा कायम ठेवत गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी परिसरातील सर्व जातीधर्मांतील गरजूंना मदत पोचविण्याचे काम सुरू केले आहे. कुर्बानीचा अर्थ केवळ बकºयाचा बळी देण्यापुरताच मर्यादित नसून पीडितांसाठी स्वकमाईतील थोडासा वाटा देणे असा असल्याचा संदेश मुस्लिम युवकांनी देण्याचा चांगला प्रयत्न सुरू केला आहे.तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, लोणावळा, देहूरोड, कामशेत आणि परिसरातील युवकांनी एकत्र येत ‘उम्मती यंग भारत सर्कल’ नावाने सामाजिक संस्था स्थापन केली आहे. अमीन खान आणि जलालखान आलमेल यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशेहून अधिक सुशिक्षित युवकांनी प्रगत विचारांची कास धरत सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. सर्कलचे अध्यक्ष इमरान आलमेल म्हणाले की, मळवलीतील मदरसा, नायगावातील एसईसी तेहमिना बारमा स्कूल अपंगांची शाळा, इंदोरीतील अनाथ संस्थेतील मुला-मुलींसाठी धान्यवाटप आणि इतर मदत पोचविण्याचे काम सुरू आहे.
बकरी ईदनिमित्ताने पीडित, अपंगांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 6:17 AM