पिंपरी - कोरेगाव भीमा येथील वादंगानंतर राज्यात सर्वत्र त्याचे पडसाद उमटले. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला. शहराच्या विविध भागांत आंदोलने झाली. बंद जाहीर केल्याने बाजारपेठ तसेच दुकाने बंद ठेवावी लागली. परिणामी दोन दिवसांत शहराच्या आर्थिक उलाढालीचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. बाजारपेठेतील मोेठी दुकाने तसेच छोट्या टपरीधारकांच्या व्यवसायावरसुद्धा विपरित परिणाम जाणवला.कोरेगाव भीमा येथील वादंगाचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटले. १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे दोन गटांत वादंग झाले. वाहनांची तोडफोड तसेच दगडफेक असे त्या वादंगाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले. ही घटना घडल्यानंतर पुण्यासह दुपारी २ नंतर पिंपरी-चिंचवडमध्येही तणावाची परिस्थिती निर्माण झाली.रस्त्यावरील वाहनांची गर्दी ओसरू लागली. काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली. दुसºया दिवशी या घटनेचे पडसाद शहरभर उमटले. अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवणे पसंद केले. तिसºया दिवशी महाराष्टÑ बंदची हाक दिल्याने सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सलग दोन दिवस शहरात तणावाचे वातावरण होते.१हॉटेल, दुकानांवर दगडफेक झाली. रास्ता रोको, रेल रोको आंदोलन झाले. सुमारे पाच तासांहून अधिक पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वल्लभनगर एसटी आगारातून एसटी महामंडळाच्या बसगाड्या बाहेर पडल्या नाहीत. खासगी वाहतूक व्यावसायिकांनीही भीतीपोटी बस मार्गावर सोडल्या नाहीत. अनेकांनी आपली चारचाकी वाहने बाहेर न आणता, वाहनतळावरच उभी केली.२दंगलसदृश्य परिस्थती निर्माण झाल्याने अनेक जण घराबाहेर पडले नाहीत. वाहतूक व्यवसायांसह, मंडई, हॉटेल, चित्रपटगृह, सराफी दुकाने, मॉल तसेच छोट्या टपºयाही बंद ठेवण्यात आल्याने नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत अक्षरश: शुकशुकाट दिसून आला. भाजी विक्रेत्यांनी दोन दिवस दुकाने बंदच ठेवली. त्यामुळे एकूणच बाजारपेठेतील कोट्यवधींचे अर्थकारण ठप्प झाले. व्यावसायिकांना त्याची झळ पोहोचली.
बाजारपेठ बंदमुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, आंदोलनाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:57 AM