पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस उलटून गेले, तरी बँकांसमोरील रांगा कायम असून, शहरातील एटीएम रोकड अभावी अद्याप बंद असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. उद्योग-व्यवसायावर मंदीचे सावट पसरल्याने बाजारात पुरेसे खेळते चलन नाही. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर आपोआप बंधने आली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून कॅशलेस व्यवहारावर भर दिल्याचे दिसत आहे. नोटाबंदीच्या निर्णयावेळी ५० दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. अद्यापही नवीन चलनी नोटांचा तुटवडा असल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शहरातील बहुतांश एटीएम बंदच असल्याने नागरिकांनी बँक ांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नोटांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना अपेक्षित रक्कम देण्यावर मर्यादा येत असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या सर्व गोंधळामध्ये चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे काढायचे असतील, तर सकाळी आठपासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. जेणेकरून कामाला दांडी होणार नाही. मात्र, बँका सुरू होण्याची वेळ साडेनऊची असते. प्रत्यक्षात मात्र व्यवहार सुरू होण्यासाठी अकरा वाजतात. त्यामुळे नोकरदार वर्गाला त्या दिवशी सुटीच घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. गृहिणींंना स्वयंपाकघरातील बजेट सावरताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)सायबर क्राइमचे वाढले भय कॅशलेस व्यवहारनोटाबंदीनंतर कॅशलेस ही संकल्पना जोर धरू लागली आहे. शासनाकडूनही डेबिट, क्रेडिट कार्ड, पेटीएम, माय वॉलेट, बिल बचाओ अशा इंटरनेटवर आधारित प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरुण वर्गाकडून या प्रणालीचा वापरही केला जात आहे. मात्र, निरक्षर, अल्पशिक्षित, ज्येष्ठ नागरिकांना असे कॅशलेस व्यवहार करण्यावर बंधने येत आहेत. अनेकांकडे तर डेबिट अथवा क्रेडिट कार्डच नाहीत. अशांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच भारतामधील सायबर सिक्युरिटी यंत्रणा कितपत सक्षम आहे, याविषयी उलटसुलट चर्चा असल्याने आॅनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक जण धजत नाहीत. तसेच अनेक मजूर व वर्गाकडे अशा डिजीटल सुविधाच नाहीत. त्यामुळे मजुरांनी हा त्रास कधीपर्यंत सहन करायचा, असा प्रश्न विचारला जात आहे. निगडी : गेल्या महिन्याभरात दिवसभर बँकांसमोर पैसे भरण्यासाठी आणि नवीन नोटांसाठी गर्दी कायम राहिली होती. मात्र, या नोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाले असून, निगडी परिसरातील बहुतांश बँकांमधील व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रहाटणी : ५० दिवस पूर्ण झाले. मात्र, परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आली नाही. बँकांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला असला, तरी नागरिकांच्या समोर असलेल्या समस्या सुटता सुटत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.सांगवी : बँकांच्या समोर अद्यापही रांगा कायम आहेत. बहुतांश एटीएममध्ये पैसाच नसल्याने शहरातील एखाद्या एटीएममध्ये पैसे आले की, मोठ्या रांगा दिसत आहेत. शासनाच्या कॅशलेस प्रणालीसाठी नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बँक, एटीएमसमोर रांगा कायम
By admin | Published: December 31, 2016 5:33 AM