लोणावळा : पुणे व ठाणे जिल्ह्यातील विविध भागात बँकेतील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी अालेल्या नागरिकांकडील एटीएम कार्डची हातचलाखीने अफरातफर करत नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या उल्हासनगर येथील एका टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांना यश आले आहे.या टोळीने पुणे जिल्ह्यात चार व ठाणे जिल्ह्यात सात ठिकाणी एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारला असल्याची कबुली चौकशी दरम्यान दिली आहे. मनोज उर्फ मनीष उर्फ मन्या दत्तू सोनवणे (रा.701, शंकर हाईट्स, चिंचपाडा, अंबरनाथ, ठाणे ) असे या टोळीतील मुख्यसूत्रधाराचे नाव असून महेश पांडुरंग घनघर ( रा. उल्हासनगर, ठाणे) अशी बनावट एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत चोरट्यांचे नाव आहे. घनघर याच्या विरोधात यापूर्वी ठाणे जिल्ह्यात सात गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील आणखी तिघेजण फरारी असून, पुणे व ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. लोणावळा शहर व पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ५ ऑगस्टला लोणावळ्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येथील एटीएम मध्ये लोणावळ्यातील तुंगार्ली येथील सुशील धोंडिबा धनकवडे ( वय-६१) हे त्यांचे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी यातील आरोपींनी धनकवडे यांच्यावर लक्ष ठेवत आरोपींनी त्यांच्याकडील बनावट एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून धनकवडे यांचे एटीएम कार्ड हस्तगत करत त्याव्दारे धनकवडे यांच्या खात्यातून ३ लाख ४० हजार रुपये काढून पोबारा केला होता. या घटनेचे दृश्य येथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्याचप्रमाणे या टोळीने सामान्य नागरिकांसोबत पोलीसांना देखिल गंडा घातलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस नाईक वाजे यांच्या मुलीच्या एटीएम कार्डचीही हातचलाखीने अदलाबदल करून खेड (राजगुरुनगर) येथील एटीएम खात्यातून सुमारे १२ लाख रुपये काढून पोबारा केला होता. यामुळे बनावट एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून नागरिकांच्या जीवनाच्या पुंजीवर डल्ला मारण्याची अनोखी पद्धत वापरून एटीएम मधून पैसे हडप होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत झाली होती. यामुळे या प्रकरणाचा तपास लावणे हे एक मोठे आव्हान पोलीसांच्या समोर होते. लोणावळा शहर व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या सर्व ठिकाणच्या घटनेच्या प्रकारांचा अभ्यास व तपास करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेज हक, अप्पर पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्या ठिकाणी मिळालेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे उल्हासनगर येथील काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीसी हिसका दाखविताच या टोळीतील मुख्यसूत्रधारासह ताब्यात घेतलेल्या त्याच्या साथीदाराने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांची अधिक चौकशी केली असता या टोळीने पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी फसवणूक केले असल्याचे सांगितले आहे. यामध्ये लोणावळा शहर व बारामती येथे प्रत्येकी एक व खेड (राजगुरुनगर) येथे दोन घटनांचा समावेश आहे. तसेच महेश घनघर याच्या विरोधात ठाणे जिल्ह्यात सात ठिकाणी गुन्हे दाखल असून, यामध्ये कल्याण, अंबरनाथ, शिक्रापूर येथे प्रत्येकी दोन व मुरबाड येथे एक समावेश आहे. या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केले असता वडगाव न्यायालयाने १६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
एटीएम कार्डची अफरातफर करत नागरिकांना लुबाडणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 8:38 PM