संजय माने, पिंपरी नमस्कार... मी ... बँकेचा प्रतिनिधी बोलतोय. आपले क्रेडिट कार्ड वापरात आहे का? या कार्डऐवजी आपणास बँकेकडून दुसरे कार्ड द्यायचे आहे. कृपया पासवर्ड सांगा. कधी अशा पद्धतीचे संभाषण, तर कधी बँक अधिकारी असल्याचे भासवून आपल्या बँक खात्याचा तपशील द्या, अशी मागणी केली जाते. त्यातून कोणीतरी गळाला लागते. अशा प्रकारे क्रेडिट कार्डची माहिती घेऊन बँक खात्यातील रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार शहरात वाढू लागले आहेत. जुलैमध्ये चिखलीतील प्रतिमा चौधरी या महिलेला मोबाईलवरून असाच कॉल आला. त्यांनी सहजपणे क्रेडिट कार्डचा क्रमांक व अन्य माहिती दिली. त्याचा गैरफायदा उठवीत लगेच त्यांच्या खात्यातून आॅनलाइन १२ हजार ४०० रुपये रक्कम दुसऱ्याच्या बँक खात्यात वर्ग झाली. काही क्षणांत त्यांच्या मोबाईलवर एसएमएससुद्धा आला. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या घटनेपाठोपाठ जुनी सांगवी येथील प्रियंका पाटील यांनाही असाच कटू अनुभव आला. त्यांच्या बँक खात्यातील ५० हजारांची रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग झाली. पाठोपाठ चिंचवडच्या प्रांजली शिंदे यांनाही बँक अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांच्या खात्यावरील ९८ हजारांची रक्कम आॅनलाइन वर्ग केली.यशवंतनगर येथे राहणाऱ्या प्रतीक्षा जोशी यांना अशाच पद्धतीने संपर्क साधण्यात आला. शहरात घडलेल्या अशाच घटना वृतपत्राच्या माध्यमातून वाचनात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी सावधगिरी दाखवीत मोबाईलवर बोलणाऱ्या त्या गृहस्थाला काही प्रश्न विचारले. प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर बँक खात्याचा तपशील देण्याची तयारी दर्शविली. जोशी दाद देत नाहीत, चाणाक्ष आहेत, हे लक्षात येताच त्या व्यक्तीने फोन बंद केला. जोशी यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईलची रिंग वाजत होती. प्रतिसाद मिळत नव्हता. जागरूकता दाखविल्यामुळे फसवणूक टळली.
बँक खात्याची माहिती देऊन व्हाल कंगाल
By admin | Published: August 31, 2015 3:59 AM