पिंपरी : लोकसभा निवडणुकांचे निकालाला २० दिवस बाकी आहेत. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर समर्थकांनी लावले आहेत. मावळ लोकसभेसाठी सोमवारी (दि.१३) मतदान झाले. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच मावळ विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या देहूगाव आणि माळीनगर परिसरात संजोग वाघेरे-पाटील यांच्या समर्थकांनी 'खासदार' असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत.
अभिनंदनाचे बॅनर -
"खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित...घासून नाही ठासून हाणली... "मा. श्री संजोगजी भिकू वाघेरे यांचे प्रचंड बहुमतांनी खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ..." असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७% इतके मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेतही टक्केवारी कमी आहे. तरीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असल्याचे बॅनरच्या माध्यमातून दिसत आहे.
१ लाख ७० हजारांचे मताधिक्य...
निवडणूक आयोगाने बूथ निहाय मतदान आकडेवारी बुधवारी जाहीर केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अंदाज लावत वाघेरे यांना एक लाख ७० हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे.