पिंपरी : कोण पार्थ पवार, असे म्हणणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांनी एकेकाळी स्थायी समितीच्या निवडणुकीत कोणाची मदत घेतली, हे जनतेला सांगावे. पार्थ पवार यांच्या फ्लेक्सची धास्ती बारणे यांनी घेतली आहे. पार्थ प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरले, तर मावळच काय बारणे यांना ‘गुगल’वर शोधले, तरी ते सापडणार नाहीत. बारणे यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आला असून, दिवा विझताना जसा फडफडतो तशी बारणे यांची फडफड सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पवार यांचे दौरे आणि नववर्ष फलकही झळकत आहेत. त्याविषयी बोलताना खासदार बारणे यांनी ‘कोण पार्थ पवार, मी कोणात्याही पवारांविरोधात लढण्यास तयार असल्याची टीका गुरुवारी केली होती.या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नाहीत. त्यामुळे पार्थ मावळातून उमेदवार असतील की नाही हे स्पष्ट नाही. कार्यकर्ते पार्थ पवार यांचे फलक लावत आहेत. बारणे यांनी पवारांच्या नावाची धास्ती घेतली आहे. प्रत्यक्षात पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास बारणे यांचा पराभव अटळ आहे. शरद पवार यांच्यामुळे बारणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती झाले होते, याचा त्यांना विसर पडला आहे. बारणे यांच्या पुस्तकामध्ये शरद पवार यांचा फोटो असतो. त्यांचे पार्थ पवार नातू आहेत. पार्थला ओळखत नसतील, तर बारणे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ’’