पिंपरी: गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे वेल्हा आणि मावळ तालुक्यातील काही गावांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणच्या सत्तर कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करत वीज पुरवठा सुरळीत केला. निलगिरीच्या झाडाला अँगल लावून आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा पूर्ववत केल्याने वेल्हा तालुक्यातील कोव्हीड सेंटरचा वीज पुरवठा त्याच दिवशी सुरळीत करण्यात यश आले.
गेल्या रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने वीज यंत्रणेची हानी झाली. वेल्हा तालुक्यातील दापोडे, विंझर, वांजळे, मालवली, शिरगाव परिसरातील आठ विद्युत खांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे तालुक्यातील ७० गावे, वस्त्या, ग्रामीण रुग्णालय आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कोरोना रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाला. पाबे उपकेंद्रातील मुख्य वीज वाहिनीचे दोन खांब कोसळल्याने ऐंशी टक्के भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
रुग्णालयाचा वीज पुरवठा पूर्ववत करणे गरजेचे असल्याने आपत्कालीन उपाय म्हणून निलगिरीच्या झाडाला व्ही आकाराचा अँगल लावून त्याच दिवशी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे रुग्णालयासह इतर ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत राहिला. त्या नंतर दुसऱ्याच दिवशी उप कार्यकारी अभियंता शैलेश गीते, शाखा अभियंता विठ्ठल भरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस कर्मचाऱ्यांनी आठ खांब उभारून वीज पुरवठा सुरळीत केला. मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील ५५ घरांच्या कळकराई गावाचा वीज वीज पुरवठा खंडित झाला होता. जवळपास दीड किलोमीटर खोल आणि अरुंद दरीतून जाणारी वीज वहिनी दुरुस्ती करण्यात आली. मावळचे उप कार्यकारी अभियंता विजय जाधव, शाखा अभियंता श्याम दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीस कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने वीज दुरुस्तीचे काम केले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांचे समाज माध्यमांवर कौतुक केले.