रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला आणखी वर्षापेक्षा अधिक अवधी आहे. मात्र निवडणुकीसाठी उतावळलेल्या इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. शहरातील वॉर्डात हे स्वयंघोषित उमेदवार सक्रीय झाले आहेत. दररोज आपल्या पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात केली असली, तरी त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. सध्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हॉट्स अपवर अनेकांना शेकडो मेसेज मनात नसतानासुद्धा वाचावे लागत आहेत.निवडणुकीतील इच्छुक आता विविध कार्यक्रमांचे आयोजन करून तुमच्या सुख-दु:खात सहभागी असल्याचा देखावा करीत गल्लोगल्ली फिरत आहेत. कोणत्याही पक्षाचे राज्य पातळीवरील नेते या भागात आले असता, संबंधित इच्छुक त्यांच्यामार्फत मनधरणी करण्याचा प्रयत्नही करीत आहे. सकाळीच गुडमॉर्निंग ,नमस्कारचा मेसेज व्हॉट्स अपवर झळकत असल्याने नागरिक कमालीचे हैराण आहेत. आत्तापासूनच वॉर्ड झाले, तर कशा प्रकारे निवडणूक लढवायची किंवा प्रभाग झाले तर कसे चित्र राहील याची बांधणी केली जात आहे. मागच्या वेळेस निवडणुकीत हारलेले उमेदवार नवीन युक्त्या वापरीत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, तर नवीन विविध पक्षांचे कार्यकर्ते तर कधी निवडणूक येईल, इतके उतावीळ झाले आहेत. पैसा कितीही गेला तरी चालेल, पण निवडणूक लढविणारच असा चंग अनेकांनी बांधला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला वर्षभराचा अवधी शिल्लक असला, तरी सद्य:स्थितीचा विचार केला असता, अंतर्गत कलह मात्र सर्वच पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. अनेक कार्यकर्ते सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचेही दिसत आहे. (वार्ताहर)
इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
By admin | Published: December 22, 2015 11:54 PM