पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनानंतर आता एच३एन२ या साथीच्या आजाराचे नवे संकट उभे राहिले आहे. साथीच्या आजाराने भोसरी परिसरात ७३ वर्षीय वृद्धांचा बळी गेल्याने महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील सहा रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. खोकल्याकडे करू नका दुर्लक्ष करू नका? असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात एच३एन२ या साथीचा पहिला रुग्ण सापडला आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण भोसरी परिसरातील आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय विभागाची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांच्याशी चर्चा केली. उपाययोजनांच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
सहा रुग्णालयात उपचार सुविधा
महापालिकेची आठ प्रमुख रुग्णालये आहेत. भोसरीतील रुग्णालय, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, आकुर्डीतील मल्हारराव कुटे रुग्णालय, चिंचवड गावातील तालेरा रुग्णालय, थेरगाव येथील महापालिका रुग्णालय, पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारांची सुविधा केली आहे.
वायसीएममध्ये ओपीडी वाढली
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दररोज ओपीडी दीड हजारांच्या आसपास असते. मात्र, वातावरणातील बदल आणि सर्दी ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे वायसीएममधील दिवसाची ओपीडी दोन हजारांवर पोहोचली आहे.
वायसीएममध्ये खाटा उपलब्ध
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारांची व्यवस्था केली आहेत. तसेच रुग्णांना अॅडमीट करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून दिल्या जातील, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
''स्वाईन फ्लू सारखाच हा साथीचा आजार आहे. लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत. त्यासाठी टॅमी फ्लू ही गोळी आहे. त्यामुळे लक्षणे आढळल्यास महापालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत, सध्या औषधोपचार, गोळया मुबलक आहेत. -डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका.''