लोणावळा : दिवाळी सुटीनिमित्त मोठ्या संख्येने पर्यटक शहरात पर्यटनाला आल्याने येथील व्यावसायिकांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. सह्याद्री घाटमाथ्यावरील निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण अशी लोणावळा शहराची सर्वदूर ओळख आहे. दिवाळी सणानिमित्त अनेक संस्था व कार्यालयांना आठवडाभर सुटी होती. शाळा-महाविद्यालयांना १५ दिवस सुटी आहे.
लक्ष्मीपूजन पार पडल्यानंतर मुंबई, पुणे, गुजरात, अहमदाबाद, बडोदा या भागातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरात पर्यटनाकरिता हजेरी लावल्याने शहरातील व ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, लॉज व सेनेटोरियम, तसेच खासगी बंगले व फार्म हाऊस फुल झाले होते. येथील प्रसिद्ध असलेली चिक्की व फज खरेदीकरिता सर्वच दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत होती. पर्यटकांची संख्या वाढल्याने लहान-मोठ्या, सर्वच व्यावसायिकांच्या व्यवसायात भर पडल्याने सर्वांचीच दिवाळी तेजीत झाली. पर्यटकांची ही गर्दी अजूनही कायम आहे.
सोमवारपासून (दि. १९) शाळांना सुरुवात होत असल्याने येणारा शनिवार व रविवारदेखील लोणावळ्यात हाऊसफुल जाईल, यात शंका नाही. लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, नागफणी पॉइंट, सनसेट या ठिकाणांसह नारायणी धाम मंदिर, वॅक्स म्युझियम, कार्ला लेणी, लोहगड किल्ला, भाजे लेणी या ठिकाणांना पर्यटक बहुतांश पसंती देत असल्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. गर्दी वाढल्याने व्यावसायिकांची दिवाळी झाली असली, तरी बेशिस्त वाहनचालकांमुळे लोणावळेकर हैराण झाले आहेत.वाहतूक पोलिसांची दिवाळी रस्त्यावरदिवाळी सुटीनिमित्त पर्यटकांनी लोणावळा शहराला सर्वाधिक पसंती दिल्याने लक्ष्मीपूजन संपताच शुक्रवारपासून लोणावळा शहरात पर्यटकांचे लोंढे दाखल होण्यास सुरुवात झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील रस्ते व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी होण्यास सुरुवात झाली. ती सोडविताना पुढील चारही दिवस वाहतूक पोलिसांना रात्रीचे किमान ११ वाजत असल्याने त्यांची दिवाळी रस्त्यावरच साजरी झाली.