पिंपरी : बिटकॉईन हे चलन नसून स्वतंत्र पैसे पाठविण्याची यंत्रणा आहे, त्यातून वीस ते पंचवीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाला आहे, फसवणूक झाली आहे. या कंपनीने बारा हजार कोटींचा शासनाचा कर बुडविला आहे. त्याविरोधात सरकारने कारवाई सुरू केली आहे, असे राज्यसभा सदस्य, प्रतोद अमर साबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या निमित्ताने साबळे यांनी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, भाजपा शहर प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.
साबळे म्हणाले, ‘‘बिटकॉईनद्वारे होणाºया आर्थिक फसवणूकीसंदर्भात तसेच काळा बाजारासंदर्भात राज्यसभेत आवाज उठविला होता. त्यानंतर एसआयटी आणि सेबीकडे तपास दिला आहे. बिटकॉईन ही एक जागतिक क्रिप्टओ चलन आहे. पण काही भारतीय लोकांनी आरबीआय कायदा झुगारून स्वतचे वॉलेट चलन आणि ब्लॉकचेनद्वारे सामान्यांना पाच ते दहा टक्के असे महिन्याला कमविण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली. यातील लोकांनी भरपूर पैसा कमविली परंतु मालमत्ता लाभ कर भरला नाही. सरकारचा बारा हजार कोटींचा कर चुकविला आहे. पैशांचा काळाबाजार करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच गुन्हे दाखल करावेत.’’
राज्यसभेचे कामकाज आठ टक्के
साबळे म्हणाले, ‘‘संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन्ही सभागृहात मिळून ७८ तास चालले. तर २४८ तास कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान लोकसभेत ५ आणि राज्यसभेत १ विधेयक मंजुर केले. पहिल्या सत्रात लोकसभेचे कामकाज अवघे चार टक्के तर राज्यसभेचे कामकाज आठ टक्के चालले. अधिवेशन ६ एप्रिल २०१८ रोजी काही काळासाठी तहकूब केले. लोकसभेत १२ तास १३ मिनिटे तर राज्यसभेत ९ तास ३५ मिनिटे चर्चा झाली.’’
कोल्हापूरात लाक्षणिक उपोषण
साबळे म्हणाले, ‘‘विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभा अधिवेशनाचे कामकाज चालू न दिल्याने युती सरकारचा एकही खासदार या कालखंडातील वेतन घेणार नाही. विरोधकांचा निषेध करण्यात येणार आहे. देशातील भाजपचे सर्व खासदार एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसणार आहे. भाजपच्या सर्व खासदारांनी आपआपल्या सोयीनुसार उपोषणांची शहरे वाटून घेतली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहरात लाक्षणिक उपोषण करणार आहे.’’