पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून लाकडी बांबूने व दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात दोन तरुण जखमी झाले. गणराज कॉलनी, रहाटणी येथे रविवारी (दि. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
अक्षय कुंडलिक पाटील (वय २४, रा. गणराज कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी, मुळगाव नळेगाव, ता. चाकूर, जि. लातूर) आणि संतोष संजय चव्हाण (वय २३), असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. जखमी अक्षय पाटील यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी दहिभाते, ओंकार तुपे, निलेश पाटील, संकेत कदम, ओंकार माने, ऋषिकेश माने (सर्व रा. रहाटणी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे १५ दिवसांपूर्वी भांडण झाले होते. फिर्यादी अक्षय पाटील हे त्यांचा मावसभाऊ संतोष चव्हाण याच्यासोबत दूध आणण्यासाठी जात असताना जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मावसभावाला लाकडी बांबूने व दगडाने मारून जखमी केले. तसेच फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली.