पिंपरी : महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे. मी बचत गटातूनच घडले आहे. बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. महिला बचत गटांची संचालिका ते बीजमाता अशी वाटचाल झाली आहे. मी महिला बचतगटांच्या चळवळीतून बीजमाता झाले. काळ्यामातीशी जोडले गेल्याने पद्मश्री पुरस्कार मिळाला, असे मत बीजमाता राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्लू डी मैदानावर आयोजित केलेल्या पवना थडी जत्रेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महापौर उषा ढोरे, प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळीकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती निर्मलताई कुटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आदी उपस्थित होते. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पवनाथडी जत्रा आहे. यंदाच्या प्लास्टिक मुक्त पवनाथडी जत्रा हा उद्देश आहे. ही जत्रा आठ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. प्रास्तविकात सभापती निर्मलताई कुटे यांनी पवनाथडी जत्रेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. विलास मडिगेरी यांनी आभार मानले...................................उद्घाटन सोहळ्यास उशीरपवनाथडी जत्रेचे उद्घाटनासाठी सायंकाळी पाचची वेळ होती. मात्र, उद्घाटन सायंकाळी सातला झाले. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे यांची नावे होती. कोणीही आमदार किंवा खासदारांनी सोहळ्यास उपस्थिती लावली नाही. विविध पक्षांचे गटनेत्यांचीही अनुपस्थिती सोहळ्यास होती.....................
महिला बचतगटांच्या चळवळीतून बीजमाता : राहीबाई पोपरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 3:38 PM
काळ्यामातीशी जोडले गेल्याने पद्मश्री पुरस्कार मिळाला
ठळक मुद्देसांगवीतील पीडब्लू डी मैदानावर पवनाथडी जत्रेची सुरूवात