लोकमत न्यूज नेटवर्करावेत : ‘लोकमत’ने पावसाळ्यापूर्वी तरी नालेसफाई होणार का? या शीर्षकाखाली गुरुवार दि़ ११ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने रावेत परिसरातील नालेसफाईला सुरुवात केली आहे. नालेसफाईच्या नावाखाली करदात्यांच्या पैशावर हात साफ केला जातो. वेळेत नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत होते़ पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करणे महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. रावेत, वाल्हेकरवाडी, शिंदे वस्ती, राजयोग कॉलनी, गुरुद्वारा परिसर आदी भागासह शहरात जवळपास १९० नाले आहेत. बहुतांश नाल्यांमध्ये गवत, झाडे, झुडपे वाढल्यामुळे आणि कचरा साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. सतत पाणी साचून राहिल्यामुळे डासांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. महापालिकेतर्फे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वतंत्र नालेसफाईचे कामकाज केले जाते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्याची सफाई न झाल्यामुळे या नाल्यातील पाणी साचून राहत होते. मात्र या समस्येकडे पालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत होते. नालेसफाई केव्हा होणार असा प्रश्न येथील नागरिक करीत होते़ वारंवार शहरातील नालेसफाई करणे आवश्यक असतानासुद्धा हे काम सतत अपूर्णावस्थेत असल्याचे चित्र दिसत होते. सर्वच उघडे नाले व गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला होता, स्वच्छता नसल्याने नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले होते़ नाल्यामध्ये वाढलेली झुडपे व कचरा काढण्यास सुरुवात केली आहे़
नालेसफाईला अखेर झाली सुरुवात
By admin | Published: May 12, 2017 5:11 AM