कार्ला : महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनेचा कार्ला मंडलमध्ये येणाऱ्या ३२ गावांतील नागरिकांनी लाभ घेतला. मळवली येथे हे अभियान राबविण्यात आले. जवळ जवळ सोळाशे लाभार्थ्यांना या अभियानाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला़ एक हजारांवर नागरिकांनी विविध योजनांविषयी माहिती घेतली. तसेच आतापर्यंत वंचित राहिलेल्या समाजातील विविध घटकांना शासनाच्या वतीने लाभ देण्यात आला.
आमदार बाळा भेगडे, तहसीलदार रणजित देसाई, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, संजय गांधी निराधार योजनेचे मावळ तालुकाध्यक्ष किरण राक्षे, जितेंद्र बोत्रे, कार्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय हुलावळे, वेहेरगाव दहीवलीचे उपसरपंच सचिन येवले, अर्जुन पाठारे, महेंद्र आंबेकर, प्रदीप हुलावळे, कार्ला मंडलाधिकारी माणिक साबळे, वडगाव मंडलाधिकारी संदीप बोरकर, शिवणे मंडलाधिकारी मेहमूद शेख, विविध गावचे तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ३२ गावांतील लाभार्थी या वेळी उपस्थित होते़जन्मापासूनच अंपगत्व असलेल्या दोन व्यक्तींना व्हीलचेअर वाटप, तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत वीस हजारांचा धनादेश तीन महिलांना देण्यात आला़ पंतप्रधान उज्ज्वल योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. तसेच पंतप्रधान निराधार योजने अंतर्गतही लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला़ याव्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना, कृषी क्षेत्रा संबंधित, नवीन शिधापत्रिका, आदिवासींना जातीचे दाखले, नागरी सुविधा केंद्रांतर्गत नागरिकांना विविध दाखले ताबडतोब मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती.