Amol Kolhe: राष्ट्रवादीबरोबर गद्दारी केली, त्यांना माफी नाही! कोल्हेंनी पिंपरीत फुंकली प्रचाराची तुतारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 03:02 PM2024-11-02T15:02:03+5:302024-11-02T15:02:51+5:30
चुकीला एक वेळ माफी असू शकते, परंतु गद्दारीला माफी नाही
पिंपरी : चुकीला एक वेळ माफी असू शकते, परंतु गद्दारीला माफी नाही. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केली, त्यांना माफ केले जाणार नाही, असे मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारासाठी खासदार कोल्हे सरसावले आहेत. कोल्हे यांनी शिलवंत यांच्या प्रचाराची तुतारी फुंकली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि सामाजिक चळवळीतील नेते, कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत.
डॉ. कोल्हे म्हणाले की, सुलक्षणा शिलवंत या वाघीण आहेत. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत होता, त्यावेळी भलेभले मागे हटत होते. परंतु ही वाघीण मैदानात उतरली. सूर्य अस्ताला जात असताना प्रकाशाचे काय, असा प्रश्न सूर्याला पडला होता. त्यावेळी एक पणती पुढे आली व तिने अंधार दूर करता येतो, हा विश्वास जगाला दिला. त्याचप्रमाणे शिलवंत विश्वास देणाऱ्या उमेदवार आहेत. सर्वस्व पणाला लावून आपण त्यांना विजयी करावयाचे आहे.
पिंपरीत बदल घडवणार : सुलक्षणा शिलवंत
सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, गेल्यावेळी पक्षाकडून मला अधिकृत एबी फॉर्म मिळाला होता. मात्र, अर्ज भरण्यापूर्वीच शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी मोठी खेळी केली. रात्रीतून दुसऱ्यास फॉर्म दिला आणि माझी संधी गेली. मात्र, मी निराश झाले नाही, पक्षाशी प्रामाणिक राहिले. जोमाने काम केले. महापालिकेत जागल्याची भूमिका बाजवली. ज्यावेळी पक्ष फुटला आणि पवार साहेब एकाकी पडले, त्यावेळी मला मनाने सांगितले, ८४ वर्षांचा योद्धा लढतोय, त्यास साथ द्यायला हवी. आम्ही काहीजण साहेबांबरोबर राहिलो. ज्यावेळी शहरात सर्व नेते दुसरीकडे गेले, त्यावेळी आम्ही साथ सोडली नाही. त्या निष्ठेचे फळ मिळाले आहे. मतदारराजाच्या साथीने पिंपरीत बदल घडवायचा आहे.