पिंपरी : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना पोलिसांनीअटक केली. पिंपरी -चिंचवड पोलिसांनी काळेवाडी येथे शनिवारी (दि. २) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपींकडूून २७ लाख २५ हजार ४५० रुपयांची रोकड आणि आठ मोबाईल आणि जुगारासाठी लागणारे इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
सनी उर्फ भुपेंद्र चरणसिंग गिल (वय ३८, रा. राजवाडेनगर, काळेवाडी, पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल (वय ५७, रा. नाणेकर चाळ, रेल्वे स्टेशनजवळ, पिंपरी), रिक्की राजेश खेमचंदानी (वय ३६, रा. बलदेवनगर, पिंपरी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह सनी सुखेजा (रा. पिंपरी) याच्या विरोधातही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवडी येथील वैभव पॅराडाईज या इमारतीत काही सट्टेबाज आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी पथकासह वैभव पॅराडाईज येथील इमारतीवर छापा टाकला. यावेळी काही बुकी आयपीएल सामन्यांवर सटट्टा लाावत असल्याचे आढळले. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, ८ मोबाईल आणि जुगारासाठी लागणारे साहित्य जप्त केले. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर हे बुकी सट्टा लावत असल्याची माहिती समोर आली. अटक केेलेले आरोपी हे काही जणांकडून जुगाराची कटींग घेऊन आरोपी सनी सुखेजा याला कटिंग देऊन आयपीएल सामन्यांवर बेटिंग लावत हाेते.
धमकी देऊन पोलिसांशी झटापट
पोलिसांनी कारवाई केली तेव्हा आरोपी सनी गील याने धमकी दिली. मला हात लावायचा नाही. माझी ओळख लांबपर्यंत आहे. माझ्यावर काही कारवाई झाल्यास चांगले होणार नाही, अशी धमकी आरोपी सनी गील याने पोलिसांना दिली. तसेच त्याने पोलिसांसोबत झटापट देखील केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.