पिंपरी : आपल्याकडील क्रेडीड कार्ड बंद करण्यासाठी इंजिनिअर तरुणीला फोन आला. मात्र, या फोनच्या माध्यमातून क्रेडीड कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने तरुणीकडून ओटीपी घेऊन लोन ॲप्सच्या माध्यमातून तरुणीच्या नावे परस्पर लोन घेतले. तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातून आणि लोन ॲपच्या माध्यमातून जमा झालेले पैसे तसेच बँक खात्यातील पैसे असे एकूण सहा लाख ४७ हजार रुपये सायबर भामट्याने परस्पर काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार एक मे ला दुपारी एक ते पावनेदोनच्या दरम्यान नांदे, म्हाळुंगी रोड, मुळशी येथे घडला. या प्रकरणी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनओळखी नंबरवरून फोन आला होता. फिर्यादीकडील क्रेडीड कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने फोन करणाऱ्या आरोपीने ओटीपी घेतला. या ओटीपीच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादीच्या नावे नवीन इमेल आयडी सुरु केला.
तसेच नेटबँकींगच्या माध्यमातून येणारे पासवर्ड या मेलआयडीवर घेतले. त्यानंतर लोन ॲपच्या माध्यमातून तरुणीच्या नावे दोन लाखाचे लोन काढले. हे लोन फिर्यादीच्या खात्यात जमा झाले असता ते परस्पर पैसे काढून घेतले. तसेच फिर्यादीच्या खात्यावर असणारे सहा लाख ४८ हजार ४९९ रुपये देखील काढून घेत फसणूक केली.