पिंपरी : देशातील ‘बिग फोर’ म्हणजे नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या विषारी सापांतील घोणस आणि मण्यार यांचे मिलन हिवाळ्यात होते. दोन्ही साप अत्यंत विषारी असून, हिवाळ्यात म्हणजेच त्यांच्या विणीच्या हंगामात मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढतो. त्यामुळे सध्या शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर साप आढळून येत आहेत.
शहरात शेकडो जुनी घरे असून, काही वास्तू वापराविना आहेत. नदी, नाल्यांचा परिसर व अडगळीची ठिकाणे मोठ्या संख्येने आहेत. तेथे सापांना मुबलक खाद्य व निवारा मिळतो. पिंपरी-चिंचवड शहरात दररोज १० ते १५ साप आढळून येतात. दररोज रात्री आठ ते १० मण्यार साप आढळतात.
घोणस व मण्यारपासून जास्त धोका
घोणस या सापाचा मिलनाचा समय डिसेंबरपासून सुरू होतो. घोणसचा गरोदर काळ सहा महिन्यांचा असतो. मे-जुलै दरम्यान घोणस ६ ते ६० पिलांना जन्म देते. घोणसचे मूळ खाद्य म्हणजे उंदीर व इतर लहान सस्तन प्राणी. घोणसचा अधिवास गवताळ भाग, शेतात, वारुळात, उंदराच्या बिळांत, नागरी वस्तींत असतो. मण्यार हा साप निशाचर असल्याने बहुतांश रात्री जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीस दंश होतो. मण्यारचा मिलन समय हिवाळ्यात सुरू होतो. मार्च ते मे दरम्यान मादी ८ ते १२ अंडी घालते आणि सात दिवसांत पिल्ली बाहेर पडतात. मण्यारचे मुख्य खाद्य म्हणजे इतर साप, उंदीर, बेडूक किंवा पाली.
सर्परक्षक, अग्निशामकच्या जवानांकडून जीवदान
भर वस्तीत, घरात, रस्त्यावर, दुकानात साप सर्रास आढळत आहेत. त्यामुळे नागरिक घाबरून जातात. सर्पमित्र तसेच सर्परक्षकांना माहिती दिली जाते. सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.
साप आढळल्यास काय करावे?
साप आढळल्यास घाबरू नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सुरक्षित ठिकाणी न्यावे. तसेच गोंगाट व गोंधळ टाळावा. लागलीच सर्पमित्र, सर्परक्षक यांना माहिती द्यावी. सापाला मारण्याचा प्रयत्न होत असल्यास विरोध करावा. सापाला मारल्यास वनविभागाकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते.
सर्पदंश झाला तर?
सर्पदंशानंतर घाबरू नये, घाबरल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया तीव्र होते. सर्पदंशानंतर मानसिक संतुलन महत्त्वाचे आहे. सर्पदंश होताच इतर कोणत्याही उपचारांमध्ये वेळ न घालवता नजीकच्या शासकीय किंवा महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे.
- योगेश कांजवणे, सर्परक्षक, पिंपरी